श्रावण मास कविता | Shravan mas kavita

हिरव्या वाटा उनाड लाटा अन् इंद्रधनुचा काठ
तृण बटा किरण छटा हा श्रवणाचा थाट

"श्रावणात घननिळा बरसला 
रिमझीम रेशमी धारा
झाडा झाडातुन फुलत गेला 
हिरवा मोर पिसारा 

कोवळ्या उन्हात खळखळल्या 
अवखळ सरींची लहर 
पानाफुलांचा नटव्या रंगाचा
अनोखा मोहक बहर

तुषार किरणांनी साकारलेला 
इंद्रधनूने वेधक कमान 
सकल ॠतुंचा करी श्रावण 
सृष्टीचे फुलून सन्मान 

राना-मनातून हिरवाई बहरली
जैसे पाचूचे पायदान 
दर्‍या खोर्‍यातले अल्लड धूके 
बाहूत सामवण्याचे भासमान 



पर्णाच्या फांदीवर निनादला सूरमयी कोकीळेचे ताण 
ऐसा मनभावन श्रावणमास सणाच्या पवित्रेला मान
_______________

"आता आला ग श्रावण, 
आल्या आल्या पाऊस सरी, 
सरीवर सरी धरती फुलारली, 
झाड वेली बहरली, 
पानं फुलं गंधाळली, 
फुलली ग धरती सारी, 

किलबिलती पाखरे, 
आनंदाच्या फांदीवरी, 
पंख पसरुनी, 
मीच मला उराशी धरी.... !!!"

_________

नुकत्याच बरसून गेल्यात
रिमझिम श्रावण धारा,

हिरव्यागार सृष्टी सवे
आनंदला हा गारवारा...

या चिंबचिंब पावसात
अल्लड, अवखळ मन

ही भिजण्यासाठी आतुरले,
सृष्टीच्या या श्रावण सोहळ्यात
मी ही सर होऊन पावसाची बरसले...

_______________

कविता - श्रावणा.....


शब्द का होती मुके
काही मला कळेना..

"श्रावणा" तुझी ती वेडी प्रीत 
अजूनही मला उमजेना...

मनही हलकेच लाजते
"श्रावणा"तुला पाहताना..

किरणांसवे  त्या 
सोनेरी ऊन्हात न्हाहताना..

कोसळताना तु "श्रावणा"
काही मला समजेना..

डोळ्यांनाही त्या मग
पापणीही हलवेना...

विसरूनी जाते मलाच मी
"श्रावणा"तुला हिरव्या शालूत पाहताना...

वाटते  सामावून घ्यावे स्वत:ला 
सहवासात तुझ्या वावरताना...

वाटते मी ही भिजावे
"श्रावणा"तु भिजताना..

हातात तुझ्या हात गुंफूनी
धून स्वरांची गाताना...

वाटते आयुष्य हे फक्त
"श्रावणा" तु असताना..

अन्  नसताना  तु रे
पानांवरचा दवबिंदू ही वाटतो सुना-सूना..!!

                 _ हर्षदा नंदकुमार पिंपळे"

________________

"होती ती एक शांत नीरव सकाळ
घननिळ्या मेघांनी अवचित दाटून आले आभाळ

मन हे श्रावणवेडे बावरे गेले कसे हरखूनी
सृजन सृष्टीचे सुंदर आल्या श्रावणसरी बरसूनी

थंड हा झोंबणारा वारा अंगणी घालतो पिंगा
चपळ त्या सुंदरी चपलेचा नभी चालतो दंगा

दमून गेला अवखळ वारा झोके तरुवेलींचे झुलवतो
खेळता शिवाशिवी प्राजक्ताशी सडा फुलांचा टाकतो

दोन क्षणांच्या पाहुण्या या सरी गेल्या इंद्रधनुची भेट देऊनी 
खगराज तो राजसी मयूरगेला मोरपिशी पिसारा फुलवूनी"

___________________________

"वाहतोय श्रावणाचा वारा तो झुळझुळ....
संगे घेऊन माहेरचा सांगावा तो प्रेमळ...
त्या परसबागेतल्या जाईजुईचा सुगंधी परिमळ....
उंच उंच झोके झुलवणाऱ्या तरूवेलींची सळसळ... 
ओढ्यात बागडणाऱ्या खट्याळ पाण्याची खळखळ...
आईच्या हातच्या स्वादिष्ट पुरणपोळीचा दरवळ...
जागवलेल्या मंगळागौरीच्या आठवणींचा निशाकाळ....
दादा वहिनीची माझ्या माया स्निग्ध निर्मळ...
अन् निरोपाच्या क्षणी मनाची होणारी तळमळ...
वाहतोय श्रावणाचा वारा तो झुळझुळ...."

_________________________

"ऊन सावल्यांच्या खेळामध्ये,

श्रावणाच्या सरसर सरी।
कधी उन्हात पडे पाऊस,
आनंद सौख्य भरे भूवरी।।

बाळगोपाळ खेळ खेळती,
पावसातील चिखलमाती।
पावसामध्ये खेळ मांडला,
नाही तयांना कशाची भीती।।

सांज सकाळ झाडावरती,
चाले पाखरांची किलबिल।
गवताची पाती दिमाखात,
मंद मंद वा-यासंगे डुलं।।

खुललं सारं रान शिवार,
शालू नेसून हिरवेगार।
डोंगर माथ्यावर पांघरे,
किरणांची सोनेरी झालर।।

ऊन पावसाचा खेळ चाले,
नभी इंद्रधनूचे धारण।
ढगामधून हळू डोकावी,
सूर्याची ती सोनेरी किरणं।।

श्रावणझुला झुला श्रावणी,
शेतकऱ्यांची फळे करणी।
डोलणारी ती पिके पाहूनी,
मनोमनी जाई तो हर्षूनी।।

   __ सुधाकर भगवानजी भुरके"

______________________

"श्रावण प्रांरभ जीवतीला,
दान देग सोनाराला..

सोमवार व्रत पुजा शंकराला,
बेलपत्र वाहते शिवलिंगाला..

प्रभात सौख्याची श्रावणाला,
दान दूधार्पण गरीबाला..

हिरवळ बहरली शिवाराला,
रक्षिते रान नागराजाला..

 गोळी नात्याची बहीण भावाला,
ओवाळते ताई रक्षाबंधनाला..

नंदलाला येणार जन्माष्टमीला,
खाऊ घालते लोणी कृष्णाला..

बाळगोपाळ येई तान्या पोळ्याला,
अन्नाचा मान देऊ नंदीला.."
________________________

श्रावणातल्या रीमझीम सरीत, तं आणि मी चींब भीजावे
घट्ट मीटुनी डोळे, मीठीत तुझ्या मी देहभान विसरावे 
शब्द होऊनी मूके, मनानेच मनाशी घालावी साद हृदयांतील लहरींनी सूर छेडावे,
जणू तो जीवघेणा प्रमादस्मीतहास्य करूनी मी, नजरेस तुझ्या कत्तल करावे
हंसर आठ बघूनी माझे, काळीज तुझे घायाळ व्हावे
अंतर मिनि श्वासातील, अंगावर शहारे फुलावे
हवेत गारवा दाटूनी, स्पंदनात रोमांच बहरावे
श्रावणातल्या रीमझीम सरीत, तं आणि मी चींब भिजावे
 "स्पर्श होउनी तुझा मज तू आणि मी एकरूप व्हावे

________________________

"ओलेचिंब करणाऱ्या सरी,
हातातला तो चहा,
मला सामावून घेणारा खिडकीचा आडोसा,
अन् तुझ्या अगणित आठवणी....
म्हणजेच माझ्यासाठी श्रावण...!"

_________________

"सरसर बरसल्या श्रावण सरी
चिंब भिजला चाफा,
मोहास्तव थेंब ओथंबले
ओघळण्याचा क्षण नको ना आता..."

__________________



""श्रावण"

'बरसुनी सरगम घनमालांची, सर्वांहुनी सर काकण तो, 
कुजबुज रानीवनी दाटली, अवखळ अल्लड श्रावण तो..!


किलबिलाट त्या आगमनाने, मुग्ध पाखरे गायन करती,
एरव्ही मधाळ नसलेलेही, गोड साखरे उधळण करती.

तव मासाने रानफुले ती, वाऱ्यासंगे डोलत होती,
मिटलेली एकेक पाकळी, अलगद हळूच खोलत होती.

खोडसाळ तो वृंदावनीचा, गोड सावळा श्रीरंग तो,
बासरी मधुन बरसणारा, मेघ मल्हार सारंग तो.

कधी संतत कधी मुसळधार तो, लपंडाव हा खेळत असतो,
कधी भिजल्या घामाच्या धारा, त्याचा त्याला मेळच नसतो.

मास प्रिय तो असे शिवाचा, अभिषेकाचे द्रावण तो,
कुजबुज रानीवनी दाटली, अवखळ अल्लड श्रावण तो..!

Instagram | aksharvaibhav"

________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या